लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: राज्यात पुढील चार दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे नंदूरबार, कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे. राज्यात रविवारी (१७ सप्टेंबर) बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत अतिवृष्टीची नोंद झाली, तर राज्यातील विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाला आहे. त्यामुळे राजस्थान, उत्तर प्रदेशाचा काही भाग, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे शनिवारी या राज्यांत बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य प्रदेशातील बैतुल येथे शनिवारी ४५० मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला. मात्र राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तसेच कोकणाच्या किनारपट्टीवर हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडत आहे.

आणखी वाचा-पुणे: अपघाताच्या बतावणीने मोटारचालकांना लुटणारी टोळी गजाआड

दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी म्हणजेच २० सप्टेंबरपर्यंत पावसाचे इशारे प्रसृत करण्यात आले. त्यानुसार रविवारी (१७ सप्टेंबर) ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना नारंगी, तर नंदूरबार, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसह धुळे आणि जळगावमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

वरूणराजाच्या साक्षीने गणरायाचे आगमन

हवामान विभागाने मुंबईला १८ सप्टेंबरपर्यंत पिवळा इशारा दिला आहे. सोमवारी राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. या दिवशी रत्नागिरीला पिवळा इशारा देण्यात आला आहे. १९ आणि २० सप्टेंबरला राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाचे आगमन होणार आहे. याच दोन दिवसांत रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain forecast for four days from today in the state pune print news psg 17 mrj