लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर आणि उपनगरात शनिवार आणि रविवारी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने नारंगी इशारा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचारावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुणे शहर आणि उपनगरासह जिल्हाभरात शनिवार आणि रविवारी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रचारावर पाणी पडण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर शनिवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा-पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हे महागद्दार – शिवाजी आढळराव पाटील
लोहगावात सर्वाधिक ५८ मिमी पाऊस
पुणे शहर आणि उपनगरात शुक्रवारी वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. लोहगाव येथे सर्वाधिक ५८ मिमी, वडगाव शेरीत ३७.५ मिमी, शिवाजीनगरमध्ये २८.० मिमी, चिंचवडमध्ये २६.० मिमी, मगरपट्ट्यात १३.० मिमी, एनडीएत १२.० मिमी, पाषाणमध्ये १०.८ मिमी, कोरेगाव पार्कात ५.० आणि हडपसरमध्ये २.५ मिमी पाऊस पडला. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या. शहरातील रस्त्यावर पाणी वाहिले. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाटही झाला. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सायंकाळी साडेपाच पर्यंत सुरू होता.
अवकाळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात हवेत गारवा निर्माण झाला होता. पुणेकरांना तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून दिलासा मिळाला. पुढील चार दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे कमाल तापमान चाळीशीच्या आतच राहण्याचा अंदाज आहे.