पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात आज, सोमवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे गेले आहे. त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी पावसाचा जोर राहील. राज्याच्या अन्य भागांत त्याचा जोर कमी होणार आहे.
वध्र्यात १४८ मिमीची नोंद
रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत वध्र्यात १४८ मिमीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल गडचिरोलीत १२५.४, चंद्रपुरात ४२, नागपुरात २४, बुलडाण्यात १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात फारसा जोर नव्हता, परभणीत २३.६, नांदेडमध्ये १३.२, उदगीरमध्ये ९ मिमी पाऊस झाला आहे.
‘यलो अलर्ट’
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी पावसाचा जोर राहील. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ. अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात अन्यत्र त्याचा जोर कमी होणार आहे.