पुणे : परतीच्या पावसाने पुण्याला चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुपारपासून जोरदार सरी बरसत आहेत. मात्र बुधवारी दुपारपासून पावसानेल झोडपून काढले. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसाची परतीची वाटचाल सुरू झाली आहे. राजस्थानसारख्या काही राज्यांतून मोसमी वारे माघारी गेले आहेत. सध्या राज्यात सर्वदूर परतीचा पाऊस पडत आहे. पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी दुपारपासूनच अंधारून येण्यास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजताच सात वाजल्यासारखा अंधार झाला होता. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.
हे ही वाचा… Maharashtra News Live: ही काय मिर्झापूर सीरिज आहे का? फडणवीसांच्या त्या बॅनवरून सुप्रिया सुळे संतापल्या
पावसाची तीव्रता इतकी जास्त होती, वाहनचालकांना नीट दिसूही शकत नव्हते. या जोरदार सरींनी शहराच्या मध्यवर्ती भागाला झोडपून काढले. त्यामुळे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, डेक्कन, नवी पेठ अशा भागांत ठिकठिकाणी पाणी साचले. रस्त्यांना ओढ्याचे रूप आले.
हे ही वाचा… चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा भाजपचे…’ अजितदादांच्या माजी नगरसेवकांचा इशारा
दरम्यान, प्रशासनाने आज (२५ सप्टेंबर) पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील २४ तासांत पुणे, रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे, चिंचवडमध्ये अतिवृष्टीसदृश्य जोरधारा… रस्त्यावर पाणीच पाणी!
हवामान विभागाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अतिवृष्टीसदृश्य स्थिती असल्याचे दिसून येते. त्यात शिवाजीनगर येथे १२४ मिलीमीटर, चिंचवड येथे १२७.५ मिलीमीटर पाऊस पडला. तर वडगाव शेरी येथे ७१.५, एनडीए येथे ४२, कोरेगाव पार्क येथे ६३, हडपसर येथे ३८, पाषाण येथे १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.