पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे शनिवारी सकाळी किंचित पुढे सरकत बारामतीत पोहोचले असून, पुढील २४ तासांत पुण्यात, तर ४८ तासांत मुंबईत येण्याची शक्यता आहे. रविवारपासून (९ जून) मोसमी वारे राज्यात प्रचंड गती घेणार असून आगामी पाच दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारांचा लाल इशारा देण्यात आला आहे.
मोसमी वाऱ्यांचे राज्यात ६ जून रोजी आगमन झाले. पण ते रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांत दाखल झाले. त्यामुळे पुढील २४ तासांत हे वारे पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र हवेचा दाब अनुकूल नसल्याने ते अडखळत पुढे जात आहे. त्यामुळे २४ तासांनी मोसमी वारे शनिवारी सकाळी किंचित पुढे सरकले आणि पुणे जिल्ह्यातील बारामतीत दाखल झाले. त्यामुळे त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. आगामी २४ तासांत ते पुणे शहरात, तर पुढील ४८ तासांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : ….तर मी वैयक्तिक स्वार्थासाठी अजित पवारांची साथ सोडेल – आमदार सुनील शेळके
दरम्यान, महाराष्ट्र ते अग्नेय अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील हवेचा दाब ९ जूनपासून अनुकूल होत आहे. या स्थितीमुळे आगामी २४ तासांत पुणे, तर पुढच्या ४८ तासांत ते मुंबईत येण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू भागात अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राज्यात दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ९ ते १३ जून दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ९ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये घाटमाथ्यावर ९ जूनपासून पाऊस वाढणार आहे.
हेही वाचा :पहिल्याच पावसात पुणे ‘पाण्यात’ : मुसळधार पावसामुळे पंधरा ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी
राज्यातील इशारा
- लाल इशारा – ९ जून – कोकण, मध्य महाराष्ट्र
- नारंगी इशारा – १० आणि ११ जून – कोकण, मध्य महाराष्ट्र
- पिवळा इशारा – ९ ते ११ जून – मराठवाडा, विदर्भ