पुणे : अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्याच्या वेगात दुपटीने वाढ झाल्यामुळे बाष्पयुक्त वारे किनारपट्टी ओलांडून घाटमाथ्यापर्यंत येऊन धडकले. तसेच ‘शिअर झोन’ पुणे जिल्ह्यावरून पुढे विदर्भाकडे जात असल्यामुळे पुणे शहरासह घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, मोसमी वाऱ्याच्या वेगात दुपटीने वाढ झाली होती. अरबी समुद्रावरून येणाऱ्या आणि साधारण दोन किलोमीटर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा सरासरी वेग २० ते ३० किमी प्रती तास इतका असतो. बुधवारी रात्री या वाऱ्याचा वेग ५० किमी प्रती तासांवर गेला होता. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे किनारपट्टी ओलांडून घाटमाथ्याला धडकले. त्यामुळे घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस झाला. तसेच शिअर झोन पुणे जिल्ह्यावरून पुढे विदर्भाकडे जात आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टाही सक्रिय आहे. तसेच दक्षिण गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने किनारपट्टीवर येत आहेत. परिणामी किनारपट्टी आणि प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा