लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, नियोजित वेळेत केरळमध्ये दाखल होईल. जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतात दमदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. जून महिन्यासह जून ते सप्टेंबर, या काळात राज्यात सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच राज्यात जोरादर पाऊस सुरू होईल.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (२७ मे) मोसमी पावसाचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यांनी अगोदरचा जून ते सप्टेंबर, या पावसाळ्याच्या काळात देशभरात सरासरीपेक्षा जास्त १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज कायम ठेवला.
महापात्रा म्हणाले की, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल केली आहे. पुढील पाच दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल. जून महिन्यात ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता असून, सरासरी ९४ टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल. उत्तर भारतात ९२ ते १०८ टक्के. महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त ९४ ते १०६ टक्के आणि दक्षिण भारतात ९४ ते १०६ टक्केपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा-Pune Accident Case : मोटारचालकाला धमकी प्रकरणात विशाल अगरवालला अटक करण्यास परवानगी
ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस
एल-निनोची स्थिती हळूहळू कमी होत आहे. जूनमध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाईल. जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होईल. हिंद महासागरीय द्विधुव्रीता जूनमध्ये सक्रिय होईल. या सकारात्मक स्थितीचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मे महिना उष्णतेच्या लाटांचा
चालू महिन्यात १ ते ७ मे आणि १६ ते २६ मे, अशा उष्णतेच्या दोन मोठ्या लाटांचा देशाने सामना केला. त्यामुळे या महिन्यात गुजरातने १२, राजस्थानने ११, मध्य प्रदेशने ९, तेलंगणाने ७, पंजाब, हरियाणाने ६, हिमाचल, उत्तराखंड, ओडिशा आणि त्रिपुराने ५ आणि महाराष्ट्राने ६ दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना केला. राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या झळांची तीव्रता जास्त राहिली. महिनाअखेरपासून उत्तर भारतात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटा कमी होतील. जूनमध्ये राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.