अरबी समुद्रात चक्रीय स्थितीमुळे तीन दिवस पाऊस
पुणे : अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस काही भागांतून माघारी जाण्यास पोषक वातावरण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची स्थिती आहे. पुढील चार ते पाच दिवसांत त्याची आणखी तीव्रता वाढून ते ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकू शकते. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्यपूर्व अरबी समुद्रावर वातावरणात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे पुढील तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू, कर्नाटक, केरळच्या काही भागांमध्ये मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पर्जन्यभान…
गेल्या काही दिवसांत मोसमी पाऊस माघारी जाण्यास पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार आदी राज्यातील काही भागातून मोसमी पाऊस माघारी गेला. तर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशाच्या काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस माघारी जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.