पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात २३ ते २८ सप्टेबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात शनिवारी (२१ सप्टेबर) हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर २३ सप्टेबर ते २८ सप्टेबर, या काळात म्हणजेच पुढील आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
हे ही वाचा…पुणे : फोटो २० संजीवनी भेलांडे,दीदी पुरस्कार संजीवनी भेलांडे यांना जाहीर
हवामान विभागाने दक्षिण राजस्थानमधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारी, २३ सप्टेबरपासून सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी परतीचा प्रवास सुरू झाला तरीही अंदमान मधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातून मोसमी पाऊस माघारी जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे. राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू असताना पडणाऱ्या पावसाला परतीचा पाऊस म्हणता येईल. सध्या तरी राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल वातावरण नाही. पुढील आठवड्यात पडणारा पाऊस नैऋत्य मोसमी पाऊस म्हणूनच ग्राह्य धरला जाईल.
हे ही वाचा…VIDEO : पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात, सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील घटना
सर्वदूर दमदार सरी शक्य
अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. राज्यात २३ ते २८ सप्टेबर, या काळात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.