पुणे : राज्यात रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. शनिवारी पुणे आणि पालघरला ‘रेड ॲलर्ट’, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिमला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ‘‘उत्तर भारतात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दक्षिण छत्तीसगडमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवार, २३ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.’’
हेही वाचा >>>पुण्यात पडकलेल्या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट करण्याचा डाव उधळला; ‘एनआयए’च्या तपासात माहिती उघड
सोमवार, २४ पासून २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी पाऊस होईल. २६ जुलैच्या दरम्यान ओडिशा किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे झुकल्यास जुलै महिन्यातील शेवटचे चार दिवस आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही दिवसांत राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
हेही वाचा >>>कुरुलकरांच्या आवाजाची चाचणी करण्यास परवानगीची मागणी; दोन ऑगस्टला न्यायालयात सुनावणी
विदर्भात पावसाचा जोर
शुक्रवारी दिवसभरात कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पावसाचा जोर कायम होता. अलिबागमध्ये ६३, हर्णेत १३, कुलाब्यात ९२, रत्नागिरीत ७, महाबळेश्वरमध्ये ३९, सोलापुरात १४, नांदेडमध्ये ३३, अमरावतीत १५, चंद्रपुरात ५०, गडचिरोलीत ४७, गोंदियात १३, नागपुरात ३६, वर्ध्यात ५७ आणि यवतमाळमध्ये ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>>पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची बदली
‘रेड ॲलर्ट’
पालघर, पुणे,
‘ऑरेंज ॲलर्ट’
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम,
‘यलो ॲलर्ट’
सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा.