काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा भागात पावसाने दमदार हजेरी लावली. खरेतर राज्यभरात सगळीकडेच पाऊस चांगला बरसला आहे. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळा आणि पिंपरी चिंचवडमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मागील २४ तासांमध्ये लोणावळ्यात १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच संततधार अजूनही कायम आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पर्यटकांसाठी आकर्षण असलेले भुशी धरण भरण्याची शक्यता आहे.
जोडून सुट्ट्या आल्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांनीही गर्दी केली आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना आजचा पाऊस म्हणजे पर्वणीच ठरला आहे. पिंपरी चिंचवडमध्येही पावसाची दमदार हजेरी दिसून आली. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि ऊन पावसाचा खेळ दिसत होता. आज मात्र वरूणराजाने पिंपरीकरांना चिंब केले आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा अचानक वाढला होता. मात्र आज झालेल्या पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्याही घटना घडल्या आहेत.