पुणे : कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोरधारांचा इशारा असून, घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात बहुतांश भागांत गेल्या सहा ते सात दिवसांत पावसाची हजेरी होती. सध्या राज्याच्या विविध भागांवर कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव आहे. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती आहे. ती पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. कोकणात पुढील तीन ते चार दिवस बहुतांश भागात पाऊस राहणार आहे. काही भागांत जोरधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तीच स्थिती राहणार आहे. विदर्भात आणखी एक दिवस बहुतांश भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ात तुरळक भागांतच पाऊस होईल.

हेही वाचा >>> “अजित पवारांना मुख्यमंत्री करा” सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर, उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या…

बुधवारी (१४ सप्टेंबर) मुंबई परिसर, आलिबाग, रत्नागिरी आदी भागांत पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला जोरदार पाऊस झाला. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला आदी भागांतही पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत नंदूरबार येथे १४० मिलिमीटर, तर लोणावळा महाबळेश्वर येथे प्रत्येकी सुमारे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पाऊसभान.. पालघर, रायगड आदी जिल्ह्यांत पुढील दोन दिवस जोरधारांचा इशारा आहे. मुंबई, ठाणे भागांतही मुसळधारांची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागांतही १५, १६ सप्टेंबरला विशेषत: घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश भागात एक ते दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in konkan central maharashtra for the next three days zws