पुणे : ईशान्य भारतात सुरु झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट पुढील दोन दिवसांत कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि ईशान्य भारतात आगेकूच केली. मात्र, केरळमध्ये हे वारे दोन दिवसांपासून अडखळले आहेत.
हेही वाचा >>> पुणे :रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी डॉक्टरांचा पुढाकार! पुण्यातील खासगी रुग्णालयांनी उचललं पाऊल
नैऋत्य मोसमी वारे ईशान्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये आणि वायव्य बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये, त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या उर्वरित भागांमध्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या बहुतांश भागांमध्ये पुढे सरकले आहेत. मोसमी वारे मध्य अरबी समुद्राच्या आणखी भागात, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळ, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी भाग आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात पुढील दोन-तीन दिवसांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट सक्रीय आहे. ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील भागात अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट पुढील दोन दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४५ ते ४८ अंशावर गेलेला तापमानाचा पारा कमी होण्यास मदत होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी दिला. शनिवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ४८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ईशान्य भारतात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती आहे. ईशान्य भारतात रेमल चक्रीवादळामुळे मोसमी वारे वेगाने पुढे जात आहेत. मात्र, अरबी समुद्राकडून केरळपर्यंतच्या मार्गावर या वाऱ्यांना पुढे नेणारी कोणतीच प्रणाली नसल्याने ते सध्या अडखळले आहेत.
हेही वाचा >>> कोविडच्या संशोधनाची दारे संशोधकांसाठी खुली! पुणे नॉलेज क्लस्टरचा कोविड वैद्यकीय विदासंच; दोन हजार रुग्णांचा समावेश
दरम्यान, राज्यात रविवारपासून पावसाची शक्यता आहे. रविवारी (२ जून) विजांच्या कडकडाटासह विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला ५ जूनपर्यंत पिवळा इशारा देण्यात आला आहे.
मतमोजणीच्या दिवशी पावसाची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी (४ जून) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.