पुणे आणि परिसरात सोमवारी मध्यरात्री पडलेल्या जोरदार पावसानंतर बुधवारी दुपारी पुन्हा एकदा वळवाच्या पावसाच्या सरी बरसल्या. काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावून नागरिकांची त्रेधा उडवली, तर काही ठिकाणी पावसाच्या केवळ शिडकाव्याने दिलासा दिला. पिंपरी-चिंचवडमध्येही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मोठा पाऊस झाला.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण आहे. बुधवारीही सकाळपासूनच कुंद वातावरण होते. दुपारीच संध्याकाळसारखे अंधारुन आले होते, जोडीला वाऱ्यासह ढगांचे गडगडणेही होते. दुपारी अडीच-तीनच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्य भागासह डेक्कन, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, कोथरुड, स्वारगेट, पर्वती अशा विविध भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. काही ठिकाणचा पाऊस जोरदार होता, तर काही ठिकाणी पावसाचा जोर फारसा नव्हता, तसेच फार वेळ पाऊस राहिला नाही. या सरींनी प्रमुख रस्त्यांवर वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवल्याचे बघायला मिळाले. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मोठी झाडे आणि आडोशाच्या ठिकाणी वाहनचालकांची गर्दी झाली होती. पावसातून चारचाकी गाडय़ा चालवतानाही चालकांना अंधारलेल्या वातावरणामुळे गाडीचे दिवे लावूनच प्रवास करावा लागत होता. वेधशाळेच्या नोंदींनुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात ४ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारीही परिसरात गडगडाटी ढग निर्माण होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली.
पिंपरी-चिंचवडमध्येही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. दुपारी दोन वाजताच्या सुमाराला सुरू झालेला पाऊस काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत सुरूच होता. पावसामुळे नागरिकांची गडबड उडाली असली तरी उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासाही मिळाला. पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक भागांतील घरांचे पत्र उडाले, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक वाहनस्वारांनी, दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवणेच पसंत केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि हमरस्त्यांवरील वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. दुपारीच संध्याकाळसारखे अंधारुन आल्यामुळे वाहनचालकांना गाडीचे दिवे लावूनच प्रवास करावा लागत होता. अनेक ठिकाणी जोराच्या वाऱ्यामुळे वाहनचालकांनी आडोशाला आसरा घेऊन पाऊस संपेपर्यंत थांबणेच पसंत केले. (सर्व छायाचित्रे-राजेश स्टीफन)