लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी दहा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबईसह बारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर भारतात तयार झालेली द्रोणीय स्थिती, दक्षिण छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या खाडीत हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. पूर्व किनारपट्टीवरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हेही वाचा… पावसामुळे दैना! पुणे-मुंबईदरम्यान २० जुलैला ‘या’ रेल्वे गाड्या रद्द
किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात संततधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकण, मुंबईत मुसळधार
कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये ६१, हर्णेत (रत्नागिरी) ९४, कुलाब्यात ६३, सांताक्रुजमध्ये ४५ तर रत्नागिरीत ३० मिमी पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापुरात २३, जळगावात २०, गडचिरोलात ११, नागपुरात १० आणि ब्रह्मपुरी (चंद्रपूरमध्ये) १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.
यलो अलर्ट
मुंबई, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, नांदेड, कोल्हापूर, नाशिक.