पुणे : किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात आणखी दोन पावसाचा जोर राहणार आहे. शुक्रवारपासून (२६ जुलै) किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात मंगळवारी पावसाने उघडीप दिली.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, त्याचे वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे.
हवामान विभागाने बुधवारसाठी रायगड, साताऱ्याला लाल इशारा दिला आहे. नाशिक, पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे. प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (२६ जुलै) किनारपट्टीवरही पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत ताम्हिनी येथे २७० मिमी, पालघर येथील तलसरी येथे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>>पुण्यातील आंदेकर टोळी पुन्हा सक्रिय; तरुणावर हल्ला
बुधवारसाठी इशारा
लाल इशारा – रायगड, सातारा
नारंगी इशारा – सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक.
पिवळा इशारा – नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती.