पुणे : पुणे शहरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी हलका पाऊस झाला होता. दुपारी मात्र पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. संध्याकाळी ढगाळ स्थिती निर्माण झाली. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाचा शिडकावा सुरू झाला. या काळात शहर आणि परिसरात आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर ढग निर्माण झाले. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरावर सुमारे ७ ते ११ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले. त्यामुळे साडेनऊनंतर मात्र पावसाने जोर धरला. दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
पाहा व्हिडीओ –
रात्री बारापर्यंत पावसाचा जोर कायम होता. पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळांतच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनेही रस्त्याने चालविणे कठीण झाल्याने संपूर्ण शहरच ठप्प झाले. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सुमारे दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. काही भागांत भिंती कोसळण्याचेही प्रकार झाले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहराच्या विविध भागांत झाडे आणि फांद्या कोसळण्याचे प्रकार झाले. शहराच्या विविध भागांतून अग्निशमन केंद्रांत दूरध्वनी येत होते. रात्री बारानंतरही पाऊस कायम होता. अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे शहरात पावसाचा जोर वाढला. कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.