सराफ बाजार मंगळवारी उघडल्यानंतर सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. सोन्याचा भाव पुन्हा वाढण्याआधी खरेदी करण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच दुकानांमध्ये रांगा लागल्या होत्या. चांदीच्या खरेदीकडे मात्र ग्राहकांचा ओघ कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सोन्याच्या दरात मोठय़ा प्रमाणात झालेली घसरण, लग्नसराई, दोन दिवसांनी असलेला गुरुपुष्यामृत योग असे सर्व योग जुळून आल्यामुळे सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सोमवारी सराफ बाजार बंद असल्यामुळे खरेदी करू न शकलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच दुकानांमध्ये गर्दी केली. अगदी दुपारीही बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत होती. संध्याकाळनंतर गर्दी अधिक वाढत गेली. सोन्याचा भाव सोमवारी २६,६०० रुपये होता. मंगळवारी भाव थोडा वाढला असला, तरीही गर्दी कमी झाली नाही. सुट्टीचा दिवस नसूनही ग्राहकांनी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. अनेक दुकानांमध्ये शिरायलाही जागा नव्हती. अगदी तास-दोन तास वेटिंग असूनही नागरिकांनी खरेदीसाठी थांबण्याचे पसंत केले होते. या बाबत सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहक संगीता पाटील यांनी सांगितले, ‘‘दर कमी झाले आहेत म्हणून आताच लग्नाची सोने खरेदी करत आहे. अचानक भाव वाढले, तर नंतर पुन्हा वाढलेल्या भावाने सोने घ्यावे लागेल. त्यामुळे आज कितीही उशीर झाला, तरी आम्ही खरेदी करणार आहोत.’’ सोन्या बरोबरच चांदीचे भावही उतरले असले, तरी चांदीच्या खरेदीमध्ये मोठी वाढ दिसली नसल्याचे राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मालक रुची जैन यांनी सांगितले. जैन म्हणाल्या, ‘‘रात्री उशिरापर्यंत ग्राहकांचा ओघ होता. सकाळी सोन्याचे भाव आणखी उतरले होते. मात्र, संध्याकाळी भाव थोडे वाढूनही गर्दीचा ओघ कमी झाला नव्हता. सोन्याला नेहमीच प्राधान्य देण्यात असल्यामुळे चांदीचे भाव उतरूनही चांदीकडे ग्राहक फारसे वळले नाहीत.’’
वामन हरी पेठे सन्सच्या ग्राहक सेवा अधिकारी अश्विनी बनकर यांनी सांगितले, ‘‘नेहमीच्या ग्राहकांची गर्दी होतीच. मात्र, अनेक नवीन ग्राहकांनीही गर्दी केली होती. लगेच खरेदी करण्यापेक्षा गुरुपुष्यामृतासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या अधिक होती.’’ योगेंद्र बी अष्टेकर अँड कंपनीचे मालक योगेंद्र अष्टेकर यांनी सांगितले,‘‘नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट गर्दी आहे. दागिन्यांइतकाच वेढणी खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा ओघ आहे. भाव अचानक वाढू शकतो या भीतीने ग्राहक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करत आहेत.’’