लोणावळा : ख्रिसमस अर्थात नाताळ या सणाचा व सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने आज २५ डिसेंबर रोजी पहाटेपासूनच पर्यटन स्थळांच्या दिशेने मार्गस्थ झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर साधारणतः दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सदरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा बोगद्याच्या तोंडावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवत मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या करत वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न महामार्ग पोलीस करत आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा गेल्या आहेत.
हेही वाचा – पिंपरी : ‘बीआरटी’त घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ कोटींचा दंड केला वसूल
u
नाताळ सण तसेच नवीन वर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक हे लोणावळा, खंडाळा, कोल्हापूर, महाबळेश्वर, पांचगणी तसेच कोकण भागामध्ये निघाले आहेत. बहुतांश पर्यटक एक खाजगी वाहनांमधून प्रवास करत असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहाटेपासूनच या वाहनांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते अंडा पॉईंट तसेच खालापूर टोल नाका या परिसरामध्ये वाहनांच्या दूरवर रांगा गेल्या आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट महामार्ग पोलीस हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. वाहतूक कोंडी मध्ये अनेक वाहने गरम होऊन बंद देखील पडत असल्याने त्यामुळे देखील कोंडीमध्ये भर पडत आहे. पर्यटकांनी या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तसेच पुढील किमान आठ ते दहा दिवस पर्यटन स्थळे जाताना वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे. जेणेकरून आपला वाहतूक कोंडी मध्ये अडकून राहून वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नियमांचे पालन करावे, चुकीच्या पद्धतीने वाहने पुढे घेऊन जाऊन वाहतूक कोंडीत भर घालू नये असे आव्हान महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.