लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई-बंगळुरु बाह्य‌वळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले. या भागातील गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

बाह्य‌वळण मार्गावरील नऱ्हे, धायरी परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झाला आहे. या भागात शैक्षणिक संस्था आहेत, तसेच खासगी कंपन्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात. मुंबई-बंगळुरू बाह्य‌वळण परिसरातील अनेक इमारती आहेत. या भागातील वाहतूक, वाढती लोकसंख्या, तसेच अपघातांचे प्रमाण विचारात घेऊन भूमकर चौकातील भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-दोन हजार कोटींचा निधी द्या, काँग्रेसची अजितदादांकडे मागणी!

भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक दरम्यानचा मार्ग अरुंद आहे. या भागात गर्दीच्या वेळी दररोज सकाळी आणि सायंकाळी जड वाहनांमुळे कोंडी होते. त्यामुळे दररोज सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या परिसरातील रस्ते, अंतर्गत रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे, असे पोलीस उपायु्क्त झेंडे यांनी कळविले आहे.

वाहने लावण्यास मनाई

सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनाल्डस् उपहारगृहसमोर दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरुपात कळावाव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Story img Loader