मॅडम, दहावीला पंचाहत्तर टक्के पडलेत आता काय करू.. बारावीनंतर कोणता कोर्स करू म्हणजे चांगली नोकरी मिळू शकेल..  मला कॉलेजची फी भरण्यासाठी एखादी संस्था मदत करेल का.. शिक्षणासंबंधीच्या अशा अनेक विचारणा सध्या महापालिकेच्या ‘हॅलो, माय फ्रेंड’ या उपक्रमात होत आहेत आणि संपर्क साधणाऱ्या युवक-युवतींना जास्तीत जास्त चांगले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या कॉल सेंटरवरून केला जात आहे.
दहावी, बारावीनंतर अभ्यासक्रमाची निवड कशी करायची, करीअर कसे निवडायचे, नोकरीच्या चांगल्या संधी कशा प्रकारे मिळू शकतील, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया कशी करायची असते, स्पर्धा परीक्षांची तयारी कशा प्रकारे करायची आदी अनेक विषयांबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन हवे असते. मात्र ते सर्वानाच योग्यप्रकारे मिळते असे नाही. ही उणीव दूर करण्यासाठी उपमहापौर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून महापालिकेने हॅलो, माय फ्रेंड ही योजना सुरू केली असून गेल्या वीस दिवसात या टोल फ्री क्रमांकावर युवक-युवती आणि पालकांकडून सातत्याने संपर्क केला जात आहे.
कॉल सेंटरवर युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागातील चौदा समुपदेशिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील काही शिक्षणतज्ज्ञ तसेच समुपदेशकांनी साहाय्य केले असून आलेल्या फोनवर सविस्तर माहिती देण्याबरोबरच तो फोन तज्ज्ञांना जोडून देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकही नोंदवून घेतला जात असून लवकरच तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.
दहावीत सत्तर टक्के मार्क मिळाले आहेत पुढे कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडू, नोकरीच्या चांगल्या संधी आहेत असे अभ्यासक्रम कोणते आहेत, ऑन लाईन प्रवेश अर्ज कसा भरायचा, कॉलेजची निवड कशी करू.. असे अनेकविध प्रश्न युवक-युवतींकडून सध्या विचारले जात आहेत. त्या बरोबरच शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्था आहेत का, मला शैक्षणिक मदत हवी आहे ती महापालिकेकडून मिळू शकेल का अशीही विचारणा करणारे दूरध्वनी येत आहेत. त्या बरोबरच अनेक दूरध्वनींवरून कौटुंबिक समस्यांबाबतही मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
करीअरची निवड कशी करायची याबाबत सर्वाधिक विचारणा होत असल्याचे या केंद्रात काम करणाऱ्या समुपदेशिकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांबाबतही मोठय़ा प्रमाणात विचारणा होत असून या दोन्ही प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हॅलो माय फ्रेंड कॉल सेंटरसाठी
नि:शुल्क संपर्क: १८००२३३६८५०
वेळ: रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा

हॅलो माय फ्रेंड योजनेत अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख छोटे अभ्यासक्रम कसे पूर्ण करता येतील याबाबत तसेच स्पर्धा परीक्षांबाबतची माहिती देण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
उपमहापौर आबा बागूल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा