रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही अनोळखी मुलीला थांबवा. तिला तुमचे नाव सांगा किंवा तिचे नाव-पत्ता विचारा किंवा काहीही बोलू नका. तिला फक्त एवढेच म्हणा- लाडक्या मुली, तू हेल्मेटशिवाय गाडी चालवू नकोस. आणि तिला एक हेल्मेट भेट द्या. तिच्यासोबत एक सेल्फी काढा आणि मला तो शेअर करा!
..ही आर्जव आहे, अपघातात आपली मुलगी गमावलेल्या एका पित्याची! ज्येष्ठ पत्रकार आणि गझलकार प्रदीप निफाडकर यांनी हे आवाहन केले आहे. निफाडकर यांची २७ वर्षांची मुलगी प्रांजली हिचे पुण्यात याच आठवडय़ात अपघाती निधन झाले. ती कथकच्या सरावासाठी स्कूटरवरून जात होती. तिच्या पुढे असलेले वाहन अचानक वळाले. त्याला धडकून ती खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचे निधन झाले. या घटनेनंतर निफाडकर यांना अनेकांनी संदेश पाठवले. त्यावर निफाडकर यांनी सर्वासाठी एक आवाहन तयार केले आणि ते सहीनिशी ‘व्हॉटस्-अॅप’वर शेअर केले. आपली मुलगी गमावली, पण इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हे आवाहन केले आहे.
‘‘तुमचे सांत्वनपर शब्द मला धीर देत आहेत. पण प्रत्येक कॉमेंट मला अधिक घायाळ करीत आहे. तेव्हा प्लीज कॉमेंट थांबवा. तुम्हाला माझ्यासाठी आणि प्रांजलीसाठी काही करायचे असेल तर एकच करा..
रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही अनोळखी मुलीला थांबवा. तिला नाव सांगा किंवा तिचा नाव-पत्ता विचारा किंवा काहीही बोलू नका. तिला फक्त एवढेच म्हणा-
लाडक्या मुली, तू हेल्मेटशिवाय गाडी चालवू नकोस. आणि तिला एक हेल्मेट भेट द्या. तिच्यासोबत एक सेल्फी काढा. मला तो शेअर करा. फार खर्चिक बाब नाही. ३००-४०० रुपयांची बात आहे, फारतर ७०० रुपये. मेंदूला मार लागला नसता तर प्रांजली वाचली असती आणि ती अपंग, मतिमंद अवस्थेत असली तरी सांभाळले असते, पण…
द्या एक ‘सेल्फी’ द्या. राज्यातील सर्व मुली आपल्याच मुली आहेत. मी काय करतो ते लवकरच कळेल.’’
निफाडकर यांचे हे आवाहन व्हॉटस् अॅपवर फिरत आहे. त्याला किती व कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल..