पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी या उपस्थित होत्या. आंदोलनकर्ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत असताना मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी यांना दादागिरी करू नका अशा घोषणा देत हुसकावून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे वाहतुक पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. त्या निषेधार्थ शहरातील अनेक संघटना एकत्रित आल्या असून मागील महिनाभरात अनेक वेळा हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. या हेल्मेट सक्तीला आज महिना झाल्याच्या निमित्ताने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, भाजपा आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांच्या हातून माईक घेत पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करु नका असे सांगताच आंदोलनकर्ते जास्त आक्रमक झाले. मेधा कुलकर्णी तुम्ही दादागिरी करु नका अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यानी आमदार कुलकर्णी यांनाच हुसकावून लावले. या घटनेनंतर आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मी हेल्मेट सक्तीच्या विरोधात असल्याने आंदोलनामध्ये सहभागी होण्यास आले. तसेच न्यायालयाकडून हेल्मेट सक्तीचा आदेश नसून पुणे शहरात ज्याप्रकारे हेल्मेट सक्ती पोलिसांकडून राबवली जात आहे, त्याबाबत येत्या महिनाभरात राज्य सरकार नागरिकांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेईल. तर आंदोलनकर्त्यानी मात्र आपण केलेल्या कृत्याबाबत बोलण्यास नकार दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmet ban protest in pune mla medha kulkarni surrounded by protestors