पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून विविध भागात राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी पुणे शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन हेल्मेटविरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.

पुण्यात सध्या हेल्मेट सक्तीवरुन वाद सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा पवित्रा घेतला असून पुणेकरांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. हेल्मेटसक्तीविरोधात हेल्मेटविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवारी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला. या दशक्रिया विधीमध्ये हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर,नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक धनंजय जाधव, काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलिसाकडून कायद्याचा धाक दाखवत हेल्मेट सक्ती केली जात आहे. ही निषेधार्ह बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता, हेल्मेट सक्ती राबवणे चुकीचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वाहतुक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

Story img Loader