पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षांत १ हजार ३९ मोटारसायकलस्वारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांश म्हणजे तब्बल १ हजार ३३ जणांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते, असे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या बारा वर्षांत शहरात रस्ते अपघातामध्ये चार हजार ६८३ जणांचा बळी गेला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत अपघाताची संख्या कमी करण्यात यश आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात राज्यात सर्वाधिक दुचाकींचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून शहरात हेल्मेट घालण्याच्या कायद्याची पोलिसांकडून अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत हेल्मेट न घालणाऱ्या ३७ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुढे चालू ठेवली जाईल, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्यांवरील कारवाईला नागरिकांचा विरोध वाढला असून काही जणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने देखील केली.
पुण्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहिल्यानंतर दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झालाचा आकडा मोठा असल्याचे समोर आले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात २०१० मध्ये एकूण १९९९ अपघात झाले होते. त्यामध्ये ४३९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यूचा आकडा हा २१७ होता. त्यामध्ये एकाही दुचाकीस्वराने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यानंतर दुचाकीच्या अपघातांची संख्या थोडीशी कमी-कमी होत आली आहे. २०१३ मध्ये १६८७ एकूण अपघात झाले. त्यामध्ये ३९९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दुचाकीवरील अपघातात मृत्यू होण्याचा आकडा हा २११ होता. त्यामध्ये २१० जणांनी हेल्मेट घातले नव्हते. यावर्षी ऑक्टोबर अखेपर्यंत १२८४ अपघात झाले असून त्यामध्ये ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वरांची संख्या १८४ असून त्यामध्ये १८३ जणांनी हेल्मेट घातलेले नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिका व वाहतूक पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नातून अपघाताची संख्या कमी करण्यात यश आले आहे. एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर, त्याबाबत स्थानिक पोलीस पंचनामा करतात. मात्र, त्याचवेळी वाहतूक शाखेचे पोलीस देखील त्या ठिकाणाला भेट देऊन रस्त्याची पाहणी करतात. या अपघाताला रस्त्याची परिस्थिती जबाबदार आहे का त्याचा अभ्यास करून महापालिका किंवा संबंधित विभागाला कळविले जाते. त्यानुसार पोलिसांनी सुचविलेल्या सूचनांनुसार बदल केल्यानंतर अपघात कमी झाल्याचे आढळून आले आहे, वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्षे        दुचाकीस्वारांचे मृत्यू        हेल्मेट न घातलेले
२०१०     २१७                                     २१७
२०११    २१९                                      २१७
२०१२     २०८                                    २०६
२०१३    २११                                       २१०
२०१४    १८४                                   १८३ (ऑक्टोबर अखेपर्यंत)
मुख्यमंत्र्यांकडे बैठक
हेल्मेटसक्तीच्या विरोधात पुण्यातील आंदोलनात सत्ताधारी भाजपचे आमदार देखील रस्त्यावर उतरले होते. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशीच संपर्क साधून पुण्यातील हेल्मेट सक्ती बंद करण्याची मागणी केली. त्यांनी याबाबत पोलीस महासंचालकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पोलीस आयुक्तांची हेल्मेटबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईला बुधवारी बैठक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा