लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालय आदी शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली. भारतात दररोज सुमारे ४११ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेट परिधान केल्यास दुचाकी अपघातात जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते.

हेही वाचा… पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे.

हेही वाचा… हनी ट्रॅप’ प्रकरणी अटक केलेल्या कुरुलकरांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “देशद्रोहाचा गुन्हा…”

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या,तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरून येणारे अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट परिधान करावे याबाबतच्या सूचना द्याव्यात, दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmets mandatory on may 24 in pune print news ccp14 dvr