पाच रुपये देण्यावरून पिंपरीतील माध्यमिक विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीत हृषीकेश बापू सरोदे (वय १५) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सरोदे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पिंपरी महापालिकेच्या वतीने त्यांना दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. हा धनादेश स्वीकारताना हृषीकेशच्या आई-वडिलांना हुंदके आवरता आले नाहीत.
महापौर शकुंतला धराडे यांच्या दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बापू सरोदे यांनी हा धनादेश स्वीकारला. महापालिका आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, विधी समितीच्या सभापती सुजाता पालांडे, नगरसेविका शमीम पठाण, झामाबाई बारणे, अतुल शितोळे आदी उपस्थित होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. वादविवाद, तणाव, जाबजबाब, चौकशी बरेच काही तेव्हा घडले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. सरोदे कुटुंबीयांसाठी विविध संस्था संघटनांनी राज्य शासन तसेच मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. त्याचप्रमाणे, महापालिकेनेही सकारात्मक भूमिका घेत मदतीची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, गुरुवारी महापौर व आयुक्तांच्या हस्ते दोन लाखांचा धनादेश सरोदे यांना देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा