राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल आणि मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवॉर्ड अर्थात मिक्ता यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक भान जपत या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
रोटरी इंटरनॅशनलने आयोजित केलेल्या ‘रोटरी सव्र्हिस एक्स्पो’ या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी मांजरेकर यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश रोटरी इंटरनॅशनलच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर, प्रांतपाल सुबोध जोशी, माजी प्रांतपाल उल्हास कोल्हटकर, नियोजित प्रांतपाल अभय गाडगीळ, दीपा गाडगीळ, रोटरीच्या सेवा प्रकल्पाचे संचालक दीपक वाणी, प्रकल्पप्रमुख राम कुतवळ, निखिल किबे, रश्मी कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
मांजरेकर म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा राज्यासमोरील मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक संस्था आणि व्यक्ती शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब असली तरी केवळ पैशांच्या स्वरूपात मदत करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे आता राज्यातील गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी तेथे मोठय़ा प्रमाणात विकासात्मक कामे करण्याची आवश्यकता आहे. हे ओळखून रोटरी करीत असलेल्या कामामध्ये मिक्ताही सहभागी होत आहे.

Story img Loader