वाघोली येथील अंध, अपंग विकास संस्थेत यंदा रंगपंचमी साजरी न करता निधी संकलन करण्यात आले आणि जमलेला निधी विदर्भ व मराठवाडय़ातील गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांना देण्यात आला.
संस्थेच्या वतीने निधीचा सात हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे देण्यात आला. या वेळी प्रहार अपंग संघटनेचे राज्य समन्वयक धर्मेद्र सातव, अंध, अंपग विकास संस्थेचे गणेश सातव, कैलास कुसाळकर, दत्तात्रय बहिरट आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात २६ जिल्ह्य़ांत गारपिटीमुळे हजारो हेक्टर पिकाचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे झाले असून हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, या नुकसानीची तीव्रता मोठी असल्यामुळे शेतकऱ्यांना संस्थेने मदत देऊ केल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader