पुणे : शहरात हिपॅटायटिस बी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषत: खासगी रुग्णालयांना ही समस्या जाणवत आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही लस घ्यावी लागते. मात्र, ती बाजारपेठेत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यामुळे वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात हिपॅटायटिस बी लसीचा समावेश आहे. ही लस नवजात बालकांना दिली जाते. याचबरोबर संसर्गाचा जास्त धोका असलेले रुग्ण, वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही लस घ्यावी लागते. रुग्णालयातील कर्मचारी हे संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनी ही लस घेणे आवश्यक असते. सध्या औषध कंपन्यांकडून या लसीचे उत्पादन कमी झाल्याने देशभरात या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयांनाही याची झळ बसली असून, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण रखडले आहे.

हेही वाचा – खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

याबाबत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव संजय पाटील म्हणाले, की सध्या खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हिपॅटायटिस लस उपलब्ध नाही. यामुळे वैद्यकीयचे विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांना ही लस उपलब्ध करून द्यावी, यासाठी आम्ही सरकारी यंत्रणांशी संपर्क साधत आहोत. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघेल, अशी आमची अपेक्षा आहे.

महापालिकेकडे पुरेसा साठा

नवजात बालकांना हिपॅटायटिस बी लस द्यावी लागते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बालकांना देण्यासाठी या लसीचा पुरेसा साठा आहे. त्यातून बालकांचे नियमितपणे लसीकरण सुरू आहे. खासगी रुग्णालयांत जन्म झालेल्या बालकांनाही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

हेही वाचा – अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास आता शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई

हिपॅटायटिस बी लसीच्या बाजारपेठेतील उपलब्धतेबाबत माहिती घेतली जाईल. शहरात या लसीचा तुटवडा असल्यास ती उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना केली जाईल. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Story img Loader