संयुक्त संशोधनातील निष्कर्ष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे  :  पृथ्वीवरील प्राचीन, जैविक उत्क्रांती आणि पर्यावरणानुसार होणाऱ्या बदलांचा पुरावा उपलब्ध करून देणाऱ्या जीवाश्मांच्या नोंदी पक्षपाती आणि विषम पद्धतीने होत आहेत. हा पक्षपात किंवा विषमता केवळ भौगोलिक घटकांमुळे नाही, तर शोषणाशी निगडित ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक घटकांमुळेही होत असल्याचे संशोधनातून निदर्शनास आले आहे. जर्मनी, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोप, भारत आदी देशांतील संशोधकांनी मिळून या संदर्भात संशोधन केले आहे. त्या बाबतचा ‘कोलोनियल हिस्ट्री अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स डिस्टॉर्ट अवर अंडरस्टँडिंग ऑफ डीप टाइम बायोडायव्हर्सिटी’ हा शोधनिबंध ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्यूशन’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनामध्ये भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) डॉ. देवप्रिया चटोपाध्याय यांचा सहभाग आहे. जगभर विखुरलेल्या जीवाश्मनोंदींवर तात्त्विक वसाहतवाद, बाजार-मूल्यांकन, शिक्षण, सुरक्षा, इंग्रजीतील नैपुण्य इत्यादींसारखे सामाजिक, आर्थिक घटक कसा परिणाम करतात, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या संशोधनात करण्यात आला आहे. तसेच अशी विषमता रोखण्यासाठीचे उपायही सुचवण्यात आले आहेत.

आतापर्यंतचे ९७ टक्के जीवाश्मशास्त्रीय संकलन हे उत्तर अमेरिका आणि पश्चिम-युरोपातील संशोधकांनी केले आहे. अशी विकसित सधन राष्ट्रे इतर देशांतही मोठय़ा प्रमाणावर संशोधन करतात. मात्र स्थानिक संशोधकांशी मर्यादित स्वरूपाचे करार करून हे संशोधन केले जाते. हे स्पष्टपणे परजीवी शास्त्राचे उदाहरण आहे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील आणि अविकसित देशांचा जीवाश्म आणि त्यांच्या वैज्ञानिक माहितीसाठी वापर करून त्या संदर्भातील ज्ञान, अधिकार सधन, प्रगत देशांच्या ताब्यात राहाते. जीवाश्मशास्त्रातील अशी जागतिक विषमता दूर करायची असल्यास, त्या संदर्भात जास्तीत जास्त नैतिक, न्याय्य, योग्य संशोधन करायचे असल्यास वसाहतवाद संपुष्टात आणून सर्वसमावेशक संशोधनपद्धती अमलात आणणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

जीवाश्म म्हणजे काय?

पुरातन काळातील सजीवांच्या अश्मीभूत अवशेषांना जीवाश्म म्हटले जाते. त्यात सांगाडे, प्राणी, वनस्पती, दगड-खडकांवरील ठसे आदींच्या अवशेषांचा समावेश होतो.

विषमता दूर करण्यासाठीचे उपाय

स्थानिक अभ्यासकांच्या गरजा आणि त्यांची संशोधनातील रुची केंद्रस्थानी मानून परस्परांवरील विश्वास आणि आदर यांवर आधारित जास्तीत जास्त नैतिक, न्याय्य, दीर्घकालीन सामायिक करार अस्तित्वात आणणे.

समृद्ध भांडवल असणारे विकसित

देश आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील, अविकसित देशांतील स्थानिक लोक वा संस्था यांच्यामध्ये समान जागतिक भागीदारी प्रस्थापित करून आर्थिक निधीच्या संकलनासाठी उपाययोजना शोधणे. विशेषत: विकसनशील आणि अविकसित देशांसाठी जीवाश्मशास्त्रातील ज्ञान उपलब्ध करून देणे, सापडलेल्या जीवाश्मांचे नमुने त्या त्या मूळ देशांकडे सुपूर्त करणे, त्यांच्या प्रसिद्धीसाठी जास्तीत जास्त संधी आणि अधिकार देण़े.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heterogeneity fossil records colonialism ysh