राष्ट्रवादीशी विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संधान बांधून काँग्रेसची वाट लावल्याचा आरोप असणाऱ्या काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पक्षाची पीछेहाट होण्यास पक्षश्रेष्ठींचा उदासीन दृष्टिकोन व कचखाऊ भूमिका कारणीभूत असल्याचा पलटवार केला आहे. संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी आपले कसलेही मतभेद नाहीत. मात्र, त्यांचे काही समर्थकच पक्षाशी गद्दारी करतात व मंत्र्यांचे कान भरण्याचे उद्योग करतात. मुख्यमंत्र्यांकडे आपली प्रतिमा जाणीपूर्वक डागाळण्यात येत आहे, त्यातून पक्षाचेच नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया भोईरांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केली.
पक्षनेतृत्वाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. निवेदने दिली, शिष्टमंडळे नेली, तरी वरिष्ठांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पक्षाची कामे मार्गी लागत नाहीत. अशा परिस्थितीत पक्ष का वाढत नाही, याचे सर्वानीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवडच्या बाबतीत पक्षाचा उदासीन दृष्टिकोन आहे. राष्ट्रवादीने शहराचे महत्त्व ओळखले, तसे काँग्रेसला ओळखता आले नाही. पदे देताना कायम पुण्याचा विचार करून पिंपरीवर अन्याय करण्यात आला. प्राधिकरणासारखी महत्त्वाची समिती नऊ वर्षांनंतरही स्थापन झाली नाही. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यासारखी पदेही कार्यकर्त्यांना मिळालेली नाहीत. मंत्री, नेते शहरात येत नाहीत. पक्षश्रेष्ठींना तरी पक्ष वाढावा असे वाटते का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारतात, त्याचे उत्तर आपल्याकडे नाही. राष्ट्रवादीशी संधान बांधल्याचा आरोप आपल्यावर होतो. मग, शहर काँग्रेसकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘त्या’ नेत्यांचेच राष्ट्रवादीशी ‘साटेलोटे’ नाही ना, असा प्रश्न आपल्यालाही पडतो. हर्षवर्धन पाटील यांच्याशी काही मुद्दय़ांवर मतभिन्नता जरूर आहे. मात्र, त्यामागे व्यक्तिगत वाद नसून पक्षहिताचा विचार आहे. त्यांच्याकडे जाऊन बसणारे बहुतांश पक्षविरोधी कारवाया करतात. बैठकांना हजर राहत नाहीत. दैनंदिन कामात सहभागी होत नाहीत. ज्यांनी पक्षाची वाट लावली, तेच आपल्याविरूध्द गरळ ओकतात. अशा मंडळींना आपण भीक घालत नाही. अजूनही पक्षाचा आपल्यावर विश्वास आहे म्हणूनच स्थायी समितीसाठी आपण शिफारस केलेल्या नगरसेवकांनाच संधी मिळाली, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले.
..ते ‘बिनडोकपणाचे राजकारण’
अजितदादा राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांच्याशी जवळचे संबंध आहेत. एनएसयूआय व युवक काँग्रेस शहराध्यक्ष होतो, त्यामुळे त्यांच्याशी सातत्याने संबंध आले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही कार्यकर्ता म्हणून त्यांचे आपल्यावर आजही प्रेम आहे. आपण राष्ट्रवादीधार्जिणे आहोत, अशी हूल ठराविक कालावधीनंतर जाणीवपूर्वक उठवली जाते, त्यामागे पक्षातील काहींचे ‘बिनडोकपणाचे राजकारण’ आहे. आपले सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत. जवळपास २५ वर्षे पक्षात निष्ठेने काम केले असून कधीही गद्दारी केली नाही. आपल्या पक्षनिष्ठेसाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High commands indifferent standpoint damaged party bhausaheb bhoir
Show comments