पुणे : तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपांवर केलेल्या कार्यवाहीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला दिला.
तलाठी भरती परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर टीसीएस कंपनीकडून २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न / उत्तरांबाबत प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्यात आले आहे. त्यानुसार टीसीएस कंपनीकडून ७९ प्रश्नांमध्ये उत्तरसूची / प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्नोत्तर तालिकेतील एकूण २१९ प्रश्नांमध्ये / त्यांच्या उत्तर सूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण ३९ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच १८० प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या “लॉगइन” खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे.
हेही वाचा : समाविष्ट ३४ गावांतील सोयी सुविधांसाठी १८ लोकप्रतिनिधींची समिती; शासनाची मान्यता
तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या २१९ प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादी मध्ये बदल झाला आहे. त्यानुसार ३६ जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.