देशातील कुठलाही वर्गसमाधानी नाही, वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे मनमोहनसिंह यांचे सरकार बदनाम झाले आहे. त्या खड्डय़ातून वर येण्यासाठीच ‘आयपीएल फिक्सिंग’ वर जाणीवपूर्वक प्रकाशझोत टाकण्यात येत आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. युती, आघाडी सोडून जनतेने आता तिसऱ्या पर्यायाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मोहननगर येथील लोकमान्य व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सुराज्य’ या विषयावर ते बोलत होते. नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. मुख्य संयोजक मारुती भापकर, प्रा. नामदेव जाधव, वामनानंद शिरसाट महाराज, इब्राहिम खान आदी व्यासपीठावर होते.
आंबेडकर म्हणाले, केवळ पुढारी भ्रष्टाचारी आहेत, असे मानून चालणार नाही तर जनताही भ्रष्ट होत आहे. त्यामुळे चांगली व चारित्र्यवान माणसे निवडून येत नाहीत. आर्थिक भ्रष्टाचार नगण्य वाटेल इतकी आजची व्यवस्था विचाराने व चारित्र्याने भ्रष्ट झाली आहे. निर्णयप्रक्रियेत सर्वसामान्य माणूस गृहीत धरला जात नाही आणि शासकीय धोरणांना मानवतावादी चेहरा प्राप्त होत नाही, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले सुराज्य येणार नाही. सुराज्य स्थापन करायचे असेल, तर  मतांचा व्यापार करणार नाही, अशी खुणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. स्वत:ची स्वप्ने व वास्तव, याचे भानही ठेवले पाहिजे. लोकशाहीत सलग दोन वेळेपेक्षा अधिक काळ सत्तेत राहता येणार नाही, अशी तरतूद असायला हवी. आपल्याकडे जातीच्या उतरंडीवर समाजव्यवस्था बेतलेली आहे. शारीरिक, सामाजिक, आर्थिक गुलामिगिरीचे चित्र आहे. अनेक मतदारसंघांचे राजेशाहीत रूपांतर झाले आहे. घराणेशाहीचे राज्य हे सुराज्याच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत, असे ते म्हणाले.
संधिसाधू पुढारी पाहतात दुष्काळाची वाट
मोठय़ा शहरांमध्ये नागरी सुविधा क्षमतांचा विचार करून लोकसंख्या मर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता पाहून शहरांचा विस्तार न झाल्यास गावागावांमध्ये तसेच शहरांमध्ये भांडणे होत राहतील. दुष्काळ ही पुढाऱ्यांच्या दृष्टीने सुवर्णसंधी असते म्हणूनच ते दुष्काळाची वाट पाहत असतात, अशी टिपणी प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली.