लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या एका वीजवाहिनीमध्ये शनिवारी (११ नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. सुमारे २०९ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे महापारेषण आणि महावितरणच्या उपकेंद्रांमधून भारव्यवस्थापन शक्य नसल्याने सकाळी सव्वासात ते सकाळी पावणेनऊ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील काही भाग तसेच खराडी, चंदननगर, मावळचा काही परिसर, उरूळीकांचन या ठिकाणी नाईलाजाने विजेचे भारनियमन करावे लागले.

आणखी वाचा-वाघोलीत बाराव्या मजल्यावरील सदनिकेला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

अदानी कंपनीच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे भारव्यवस्थापनासाठी एलटीएस (लोड ट्रिमिंग स्कीम) यंत्रणा कार्यान्वित झाली. सुमारे २०९ मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणचे १३२ केव्ही रहाटणी, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही थेऊर, १३२ केव्ही यव आणि २२० केव्ही उर्से अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांना देखील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, काळेवस्ती, थेरगाव, वाकड, निगडी, प्राधिकरण, किवळे, खराडी, चंदननगर, मावळमधील काही भाग, उरुळी कांचन शहर, कुंजीरवाडी, थेऊर, शिंदेवाडी अष्टापूर, हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी या गावांतील सुमारे २ लाख १९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी दीड तास बंद ठेवावा लागला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High voltage power line failure power cut for an hour and a half pune print news vvk 10 mrj
Show comments