पुणे : देशात २०२३-२४ या कृषी वर्षांत उच्चांकी १२०.९० लाख टन इतके मोहरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तेलबियांना मिळणारा चांगला दर, पोषक हवामान आणि प्रमुख मोहरी उत्पादक राज्यांत सिंचनासाठीच्या पाण्याची उपलब्धता चांगली राहिल्यामुळे मोहरीच्या उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगाल या प्रमुख मोहरी उत्पादक राज्यांमध्ये मोहरी पिकाच्या लागवडीला, उत्पादनाला पोषक हवामान मिळाले. सिंचनासाठीच्या पाण्याचीही पुरेशी उपलब्धता राहिल्यामुळे यंदा देशात मोहरीचे उत्पादन १२०.९० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. २०२०-२१ मध्ये ८६ लाख टन, २०२१-२२ मध्ये ११० लाख टन, २०२२-२३ मध्ये ११३.५ लाख टन उत्पादन झाले होते.

हेही वाचा >>>स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

यंदाच्या रब्बी हंगामात देशात १००.६० लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली आहे. प्रति हेक्टरी १,२०१ किलो मोहरी उत्पादनाचा अंदाज असून, एकूण मोहरी उत्पादन १२०.९० लाख टनांवर जाण्याचा अंदाज एसईएचा आहे, तर कृषी मंत्रालयाने १२६.९६ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मोहरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे.

मोहरी शेतीचे नवे प्रारूप यशस्वी

द सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) आणि सॉलिडेरिडाड, या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने देशात २०२०-२१ मध्ये मोहरीच्या शेतीचे नवे प्रारूप सुरू करण्यात आले. सध्या पाच राज्यांत ३५०० हून अधिक प्रारूप शेतीचे पथदर्शी प्रयोग करण्यात आले. या पथदर्शी प्रयोगात १,२२,५०० शेतकरी सहभागी झाले होते. नव्या प्रारूप शेतीसाठी शेतकऱ्यांना नवे संकरित बियाणे, नवे तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रे पुरविण्यात आली होती. मोहरी शेतीतील तज्ज्ञ सतत शेतकऱ्यांच्या संपर्कांत होते. उत्पादित मोहरीच्या विक्रीचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण; मॅटचा राज्य सरकारला दणका

मोहरीच्या तेलाचे उत्पादन वाढणार

मोहरीच्या शेतीचे नवे प्रारूप देशात विकसित करण्यात आम्हाला यश आले आहे. उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. देशात एकूण तेलबिया लागवडीत मोहरीचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. मोहरीच्या वाढलेल्या उत्पादनामुळे खाद्यतेलाचे आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती द सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest production of mustard in the country this year pune print news dbj 20 amy
Show comments