दत्तक प्रतीक्षेत सध्या ३००० इच्छुक पालक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लिंग श्रेष्ठत्वाच्या अवास्तव कल्पना दत्तक घेणाऱ्या पालकांमधून हद्दपार होत असून गेल्या काही वर्षांमध्ये मुलांऐवजी मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा विचार केला तरी पुण्यातील दत्तकेच्छुक पालकांचा मुली दत्तक घेण्याकडे कल दुपटीने आहे.

विविध कारणांमुळे दाम्पत्यांकडून मुलांना दत्तक घेतले जाते. गेल्या दोनेक दशकात मुले दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मूल दत्तक घेण्यासाठी सर्वप्रथम ‘कारा’ (सेंट्रल अ‍ॅडोप्शन रिसोर्स एजन्सी) या संस्थेत नावनोंदणी करावी लागते. ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागते. केंद्रीय पातळीवर ‘कारा’कडून  दत्तकप्रक्रियेचे नियमन केले जाते. ‘कारा’चे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. सध्या ‘कारा’च्या संकेतस्थळावर मुले दत्तक घेण्यासाठी तीन हजार जणांनी नोंदणी केली आहे. विविध निकषांवर पालकांची पडताळणी करून ही प्रक्रिया पार पडण्यासाठी बराच काळ जातो. मात्र तरीही मूल होण्यातील अक्षमता किंवा अन्य कारणांनी दत्तकेच्छुक पालक ती पार पाडत आहेत.

महाराष्ट्रात ६३ बालसंगोपन केंद्रे आहेत. त्यापैकी १६ बालसंगोपन केंद्रे पुण्यात आहेत. मुंबईच्या तुलनेत पुणे शहरात बालसंगोपन करणाऱ्या संस्थांची संख्या अधिक आहे. अनेक जण राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातील बालसंगोपनगृहातून मुले दत्तक घेण्यास पसंती देतात, असे निरीक्षण महिला बाल विकास विभागाच्या कार्यक्रम व्यवस्थापक मनीषा बिरारिस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदविले. दत्तक घेणाऱ्या पालकांमध्ये पूर्वी मुलांना अधिक प्राधान्य दिले जात असे. आता त्याबाबतच्या मानसिकतेत बदल होत असल्याचे राज्यभरातील दत्तक प्रक्रियेच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

मूल दत्तक देण्याची प्रक्रिया करण्यासाठी दत्तक नियमन कायदा (दत्तक रेग्युलेटरी अ‍ॅक्ट) आहे. महाराष्ट्रातील दत्तक प्रक्रिया ‘सारा’ (स्टेट अ‍ॅडोप्शन रिसोर्स एजन्सी) या संस्थेच्या माध्यमातून पार पाडली जाते. अर्भक किंवा बालकाचे पालक न सापडल्यास याबाबतचा अहवाल पोलिसांना बालकल्याण समितीकडे सादर करावा लागतो. हा अहवाल आल्यानंतर संबंधित अर्भक किंवा बालक दत्तक देण्यास पात्र (फ्री टू अ‍ॅडोप्ट) असा अहवाल दिला जातो. त्यानंतर संबंधित बालकाची नोंदणी ‘कारा’च्या संकेतस्थळावर केली जाते, असे बिरारिस यांनी सांगितले.

ज्यांना मूल दत्तक घ्यायचे असेल, त्यांनी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यांना तीन राज्यांचा पर्याय द्यावा लागतो. त्यानंतर ज्यांना मूल दत्तक घ्यायचे असेल, त्यांची माहिती घेतली जाते. शारीरिक, मानसिक, सांपत्तिक स्थितीची पाहणी केली जाते. तसेच दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर वैद्यकीय अहवाल सादर करावा लागतो. त्यांच्या घराची पाहणी (गृहभेट) केली जाते.  मूल दत्तक देण्याची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जाते, अशीही माहिती बिरारिस यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest proportion of adoption of girls is pune