पुणे : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची लोहगाव येथे नोंद झाली. बुधवारी लोहगाव येथे ४१.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले असून, शहरातही सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे.

यंदा मार्चमध्ये उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मार्चमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. या पूर्वी १२ मार्च रोजी कोरेगाव पार्क आणि लोहगाव येथे ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस तापमान कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४०.८, मगरपट्टा येथे ३९.५, चिंचवड येथे ३९.२, वडगाव शेरी येथे ३८.७, शिवाजीनगर, पाषाण येथे ३८.६, एनडीए येथे ३७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या काही वर्षांच्या सरासरी तापमानाच्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे २०२४मध्ये ३६.५ अंश सेल्सियस २०२३मध्ये ३३.४, २०२२मध्ये ३६.७, २०२१मध्ये ३६.६, २०२०मध्ये ३४.१ अंश सेल्सियस तापमान होते.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावमध्ये सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सियस तापमान अधिक आहे. तर शहरातही सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे. तापमान वाढण्याचे विशेष असे कारण नाही. कारण, दक्षिणेकडील राज्ये आणि उत्तरेकडील राज्यांतही तापमान वाढत आहे. त्याशिवाय हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. किमान तापमानातही वाढ होत आहे.

हलक्या पावसाचीही शक्यता

सध्या वाढलेल्या तापमानामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. मात्र २९ ते ३१ मार्च या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सानप यांनी सांगितले.