खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे वरसगाव आणि पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ३० हजार ६७७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास खडकवासला धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ होण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारपासून (१२ सप्टेंबर) पाऊस हजेरी लावत आहे, तर मंगळवारपासून वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (१६ सप्टेंबर) सकाळपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरात मुसळधार पाऊस पडत असल्याने सकाळी सात वाजल्यापासून दहा हजार २४६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवून सायंकाळनंतर हा विसर्ग ३० हजार ६७७ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : पुणे : धरणातून पाणी सोडल्याने सहा ठिकाणे धोकादायक
दरम्यान, मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर यंदाच्या हंगामात ११ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले. तेव्हा या धरणातून मुठा नदीत १३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात २६ हजार क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी हंगामातील सर्वाधिक ३० हजार ६७७ क्युसेकचा विसर्ग नदीत करण्यात आला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास वरसगाव धरणातून पानशेत आणि पानशेत धरणातून खडकवासला धरणात आणि खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेल्या विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
खडकवासला धरणाची विसर्ग क्षमता
खडकवासला धरणातून पाणी विसर्ग करण्याची क्षमता ९८ हजार ७६६ क्युसेकची आहे. मात्र, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव आणि पानशेत या तीन धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करता येऊ शकतो, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा : आता सर्व गोवंशाचे लसीकरण ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
खडकवासला धरणातून आतापर्यंतचा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग
वर्ष पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)
१९४३ ८० हजार ७६६
१९५४ एक लाख पाच हजार १४०
१९५८ एक लाख १३ हजार ३९२
१९८३ ८६ हजार ४९०