पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून करून पोलिसांकडे खोटी फिर्याद देणाऱ्या तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. विजेचा धक्का देऊन पतीने महिलेचा गळा आवळून खून केल्याचे तपासात उघडकीस आले.शीतल स्वप्नील रणपिसे (वय २३, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय २६) याला अटक करण्यात आली, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वप्नील उच्चशिक्षित आहे. स्वप्नीलचा स्वभाव संशयी आहे. स्वप्नीलच्या विवाहाबाबत बोलणी सुरू असताना तो विवाहेच्छुक तरुणींकडे चौकशी करायचा. त्याच्या संशयी स्वभावामुळे तरुणींनी त्याला नकार दिला होता. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला आहे. सात महिन्यांपूर्वी स्वप्नीलचा शीतलशी विवाह झाला होता, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल

शीतल ही ३ जुलै रोजी घरात एकटी होती. त्यावेळी सासरे शामराव, सासू शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते. शीतल घरात बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तिच्या अंगठ्याला वायरने विजेचा धक्का दिल्याचे उघडकीस आले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. शीतलचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली होती. नवविवाहीत तरुणीचा खून झाल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. स्वप्नीलने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. तपासात त्याच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>>कर्तव्य चोख बजावल्यावर काही क्षणात पोलिसांवर काळाची झडप, पुणे हिट अँड रन प्रकरणाच्या आधी नेमकं काय घडलं ते वाचा…

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, शिरूरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहायक निरीक्षक राहुल गावडे, अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीन, तुषार पंदारे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highly educated youth arrested for murdering his wife due to suspicion of character and filing a false complaint pune print news rbk 25 amy
Show comments