मोडतोड करून सुटय़ा भागांची विक्री

पुणे : पदवी तसेच हॉटेल व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक असलेल्या तरुणाला नोकरी गमवावी लागली. त्यानंतर त्याने शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकी चोरून त्यातील सुटय़ा भागांची विक्री करण्यास सुरुवात केली.  नाना पेठ परिसरात सुटय़ा भागांची विक्री करण्याच्या तयारीत असताना हा तरुण पकडला गेला. दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची भीती असल्याने तसेच कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीच्या दुचाकी न विकता त्यांच्या  सुटय़ा भागांची विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली.

या प्रकरणी गौरव राजकुमार शर्मा (वय ३०, रा. राजमाता कॉलनी, चोरडिया फार्म, कोंढवा खुर्द, मूळ  रा. उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. शर्मा याच्याकडून दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरलेल्या दुचाकी वाहनांची मोडतोड करून एकजण सुट्टे भाग विक्रीसाठी नाना पेठ भागात येणार असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि आशिष चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून नाना पेठ भागात शर्माला पकडले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने शहराच्या मध्य भागातून २ दुचाकी, वानवडी भागातून २ दुचाकी, भोसरी, पौड भागातून बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबविल्याची कबुली दिली.

चोरलेल्या दुचाकींची विक्री करताना पकडले जाण्याची भीती असल्याने दुचाकींची मोडतोड  करून सुटय़ा भागांची विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली. परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे, तसेच उमाजी राठोड, विठ्ठल पाटील, विनोद जाधव, गौरी राजगुरू आदींनी ही कारवाई केली. शर्मा विवाहित असून कर्जबाजारी झाल्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती त्याने दिली आहे.

Story img Loader