पुणे : पुणे ते सोलापूर महामार्गावरील अपघात स्थळे आणि अपघाताची कारणे यांचा ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या सहकार्याने अभ्यास करून महामार्ग पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या मार्गावरील स्थानिक स्वराज्य संस्थांंची मदत घेतली जाणार आहे. तसेच, अपघात स्थळांच्या ठिकाणी ‘रम्बल स्ट्रिप्स’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास सुकर होणार आहे.
पुणे ते सोलापूर या सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांंसाठी विशेष आराखडा तयार केला आहे. ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या सहकार्याने हा आराखडा बनविण्यात आला आहे. या महामार्गावरील सतत अपघात होणारी ठिकाणे आणि गर्दीचे चौक यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
महामार्गालगत असणारी गावे, बाजार, उपाहारगृह, वर्तुळाकार चौक यामुळे वाहतूककोंडी होते. लोणी काळभोरपासून उरुळी कांचन, वरवंड, पाटस, कुरकुंभ, रावणगाव, भिगवण, डाळज, टेंभुर्णी, मोडनिंब, मोहोळ या प्रमुख गावांच्या ठिकाणी कोंडी होत असते. ही कोंडी सोडविण्यासाठी चौकांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ‘रम्बल स्ट्रिप्स’ लावल्या जाणार आहेत. प्रमुख चौकांंमध्ये प्रकाश व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांंची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही कामे करताना स्थानिक स्वराज्य संस्थांंची मदत घेण्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे.
याबाबत महामार्ग पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख म्हणाले, ‘या महामार्गावरील अपघात स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. अपघातांची कारणे आणि त्यावरील उपाययोजना आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.’
आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजना
– प्रमुख चौकांतील अतिक्रमणे काढणे
– रस्त्यांंचे रुंदीकरण
– वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गावांंच्या ठिकाणी ‘रम्बल स्ट्रिप्स’ लावणे
– गावे आणि प्रमुख चौकांंमध्ये प्रकाश व्यवस्था करणे
– ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने अंमलबजावणी करणे
पुणे ते सोलापूर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष वाहतूक आराखड्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने संबधितांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. विक्रांत देशमुख, महामार्ग पोलीस अधीक्षक