टेकड्या हे पुण्याचे वैभव आणि सौंदर्य आहे. बाहेरून पुण्यात रोजगारासाठी आलेल्या लोकांकडून टेकड्यांवर झोपड्या टाकल्या जातात. राजकीय आशीर्वादाने त्या अधिकृत होतात आणि नियोजन कोलमडते. पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी अतिक्रमण करणारे आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, अशी टिप्पणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी केली. असे झाले, तर सगळे वठणीवर येतील, असेही पवार यांनी नमूद केले.
भौगोलिक माहिती प्रणालीचे संशोधक डॉ. श्रीकांत गबाले आणि मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा – बॅबलिंग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, दत्ता पुरोहित, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर आदी या वेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा >>> पुणे: पोलीस दलात भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणारा तरुण अटकेत
पवार म्हणाले, ‘विकासाच्या नावाखाली अनेक अशास्त्रीय कामे होत आहेत. अधिकारी योग्य सल्ला देत नाहीत किंवा राजकारणी त्यांचा सल्ला ऐकत नाहीत, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होतो. गेल्या काही वर्षात अधिकारी आणि राजकारण्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक विकास प्रकल्पाचा भुर्दंड आणि त्रास पुणेकरांना सोसावा लागला.’
दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून आंबील ओढा विषयावर काम करत आहे. नैसर्गिक प्रवाहासाठीचे नियम आणि या संबंधित इतर समस्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे, असे लेखक डॉ. गबाले यांनी सांगितले. तर, सन २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर आंबील ओढ्यातील जैवविविधता आणि पर्यावरण शास्त्र या अनुषंगाने लेखन केल्याचे लेखिका पारसनीस यांनी सांगितले.
ओढ्याच्या सुधारणेसाठी शास्त्रशुद्ध उपाययोजना
‘खळाळता झरा असणारा आंबिल ओढा नाला कसा झाला, याचे शास्त्रीय लेखन या पुस्तकात आहे. ओढ्याच्या सुधारणेसाठी शास्त्रशुद्ध उपाययोजना यात सुचवल्या आहेत. त्याचा प्रशासनाला चांगला उपयोग होईल. या पुस्तकात मांडलेल्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करू’, असे अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी या वेळी सांगितले.