पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना बिबवेवाडी, कोथरूड, पर्वती, एरंडवणे, हडपसर, धनकवडी, पाषाण, औंध, शिवाजीनगर वगैरे भागातील २५४ एकर एवढे टेकडय़ांचे क्षेत्र वगळण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तेवीस गावांमधील सर्व टेकडय़ांवर बीडीपीचे आरक्षण दर्शवणाऱ्या प्रशासनाने जुन्या हद्दीतील टेकडय़ा निवासी का केल्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जुन्या हद्दीचा विकास आराखडा आणि त्याचे नकाशे आता उपलब्ध झाले असून त्यांचा अभ्यास केल्यानंतर या आराखडय़ातून २५४ एकर एवढय़ा टेकडय़ांचा भाग वगळण्यात आल्याचे दिसत असल्याची माहिती पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेने जुन्या हद्दीतील टेकडय़ांचे सर्वेक्षण सी-डॅक संस्थेकडून करून घेतले होते. सी-डॅकने सादर केलेल्या अहवालानुसार जुन्या हद्दीत १,२५७ हेक्टर एवढय़ा क्षेत्रावर डोंगरमाथा/डोंगरउतार (टेकडय़ा) हे क्षेत्र दर्शविण्यात आले होते.
सी-डॅकने करून दिलेल्या अहवालानुसार, जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ात टेकडय़ा दर्शवाव्यात, असा निर्णय मुख्य सभेने घेतला होता. त्यानुसार, प्रशासनाने १,२५७ हेक्टर क्षेत्रावर टेकडय़ा दर्शविणे आवश्यक असताना नुकताच जो आराखडा प्रसिद्ध झाला आहे, त्यात ८४२ हेक्टर क्षेत्रावर टेकडय़ा दर्शवण्यात आल्या आहेत आणि ३०४ हेक्टरवर वनांचे क्षेत्र दर्शवण्यात आले आहे. म्हणजेच एकूण १२५७ हेक्टरवर टेकडय़ा दर्शवणे आवश्यक असताना १,१४६ हेक्टर क्षेत्रावरच टेकडय़ा, वने यांचे क्षेत्र दर्शवण्यात आले असून उर्वरित १११ हेक्टर (२५४ एकर) क्षेत्राचे निवासीकरण प्रशासनाने केले आहे, अशी तक्रार केसकर यांनी केली आहे.
बिबवेवाडी, कोथरूड, पर्वती, पाषाण, औंधसह अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर टेकडय़ा असताना व त्या सी-डॅकच्या अहवालात दर्शवण्यात आलेल्या असताना प्रशासनाने त्या का वगळल्या, अशी विचारणा केसकर यांनी केली असून तेवीस गावांमध्ये बीडीपीचे आरक्षण दर्शवण्यासाठी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीने आता या प्रकाराबाबत पक्षाची भूमिका जाहीर करावी, अशीही मागणी जनहित आघाडीने केली आहे.
टेकडय़ा वगळण्याबरोबरच आराखडय़ात मोठय़ा प्रमाणात निवासीकरण करण्यात आले असून त्याविरोधात पुणे जनहित आघाडीची जनजागरण मोहीम शनिवारपासून सुरू होत आहे. नागरिकांना ही माहिती देऊन या वेळी त्यांच्याकडून हरकती-सूचनाही गोळा केल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hills over 254 acres excluded from development plan
Show comments