अनेकविध विषयांवर नवनवीन पुस्तके येत असतात. पण, टॅब, मोबाइल या अभासी विश्वात रमलेली पुढची पिढी पुस्तके वाचते का?, असा सवाल हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी उपस्थित केला. पुस्तके म्हणजे समाजकोष असतो, असेही त्यांनी सांगितले. ‘इंद्रायणी साहित्य’च्या वतीने शेफाली वैद्य यांच्या ‘नित्य नूतन हिंडावे’ आणि ‘चितरंगी रे’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार प्रदीप रावत, प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि इंद्रायणी साहित्यच्या मुग्धा कोपर्डेकर या वेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा >>>पुणे: सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आर्लेकर म्हणाले, दर आठवड्याला शाळेमध्ये जाऊन ‘तुम्ही काय काय वाचता’ असे विचारतो तेव्हा, ‘पाठ्यपुस्तके’ असे उत्तर मुलांकडून येते. चार ओळी लिहा असे म्हटल्यावर त्यांना लिहिता येत नाही हे वास्तव आहे. त्यांना अन्य पुस्तके वाचनाची आवड नसते असे नाही. परंतु, त्यांच्या हातात पुस्तके दिलीच गेली नाहीत. त्यामुळे पुस्तके देऊन, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या अवतीभोवती जो समाज असतो तो समाज समजून घेणे आणि त्या समाजाच्या व्यथा आणि आनंद पुस्तक रूपाने मांडणे हा आवश्यक सामाजिक घटनाक्रम आहे. एखादा विचार समाजात रूजविण्यासाठी पुस्तक हे सशक्त माध्यम आहे.
हेही वाचा >>>“गुलाबरावांनी डुकारासारखे तोंड घेऊन…”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची जीभ घसरली
रावत म्हणाले की, थोडक्यात लिहिण्याची कला मोजक्या लोकांनाच साध्य होते. कोळसा उगाळण्यापेक्षा चंदन उगाळण्याची वृत्ती या लेखनात दिसते. ही भटकंती आगळीवेगळी आणि वाचक म्हणून आपल्याला समृद्ध करणारी आहे. पोंक्षे म्हणाले की, भटकंती करून मायदेशात परतताना लोक वस्तू आणि खाण्याचे जिन्नस वगैरे आणतात. एवढ्या क्षुल्लक बाबींपुरते पर्यटन मर्यादित न राहता त्या देशातील भाषा, संस्कृती आणि साहित्याचा ठेवा समजून घेतला पाहिजे. प्रवासवर्णन कसे चपखल असावे याचा ही पुस्तके वस्तुपाठ आहेत. वैद्य यांनी आपल्या मनोगतामध्ये पुस्तक लेखनामागची भूमिका सांगितली. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. कोपर्डेकर यांनी आभार मानले.