कराड : हिंदू एकता आंदोलन कराड शाखेतर्फे दर वर्षीप्रमाणे आयोजित यंदाच्या पारंपरिक शिवजयंती उत्सवाचे हे ५५ वे वर्ष असल्याचे औचित्य साधून या वर्षीपासून हिंदू धर्मयोद्धा, हिंदू धर्म रणरागिणी, हिंदू धर्म संघटक व हिंदू धर्म प्रचारक या विशेष पुरस्कारांची घोषणा ‘हिंदू एकता’चे प्रांताध्यक्ष विनायक पावसकर यांनी शनिवारी केली.याबाबतच्या निवेदनात पावसकर यांनी म्हटले आहे, की स्पष्टवक्ते, निर्भीड आणि राष्ट्रभक्त पत्रकार, सुदर्शन न्यूजचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी आपल्या लेखणीने भारतीय पत्रकारितेला एक नवा चेहरा दिला आहे.
त्यांच्या या कृतिशील कार्याच्या गौरवार्थ ‘हिंदू एकता आंदोलन’तर्फे त्याना ‘हिंदू धर्मयोद्धा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कुमारी शर्विका जितेन म्हात्रे यांनी वयाच्या तिसऱ्या ते सहाव्या अशा तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर, नाशिक जिल्ह्यातील कठीण असा साल्हेर गिरिदुर्ग, गुजरातमधील गिरनार शिखर आणि महाराष्ट्रातील तब्बल १४० गड-किल्ले यशस्वीपणे सर केल्याबद्धल ‘हिंदू धर्म रणरागिणी’ पुरस्कार, तसेच आपले जीवन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व्यतित केलेले, गेली अनेक वर्षे हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना हिंदू धर्म रक्षण व जागृतीसाठी कार्य करणारे, त्याचबरोबर लव्ह जिहाद, गोरक्षा यांसारख्या गंभीर विषयांवरही काम करणारे मुकुंद आफळे (सातारा) यांना हिंदू धर्म संघटक पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली अनेक वर्षे ‘शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्तान’च्या माध्यमातून पदभ्रमण गडकोट मोहीम यशस्वीपणे पूर्ण करीत हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारे सागर आमले (कराड) यांना ‘हिंदू धर्मप्रचारक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर सन्मानार्थींना मान्यवरांच्या हस्ते बुधवारी (दि. ३०) शिवजयंतीच्या कराडमधील ऐतिहासिक दरबार मिरवणुकीच्या समारोपावेळी शहरातील शिवतीर्थ, दत्त चौक येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पावसकर यांनी म्हटले आहे.