पुणे : सकल हिंदू समाजातर्फे येत्या रविवारी (२२ जानेवारी) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृ शक्तीच्या नलिनी वायाळ, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश पवळे म्हणाले,की शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा >>> देशातील सर्वाधिक खोल मेट्रो स्थानक पुण्यात

धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद प्रतिबंधात्मक कडक कायदे करावे, त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरुवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल असेही आयोजकांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu jan akrosh morcha organized on sunday pune print news bbb 19 ysh