पुणे : अभिनेता शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानच्या अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, ॲड सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्यन खान घटनास्थळी रंगेहात पकडला गेला होता, तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने गुन्हा मान्य केला होता, त्या आधारे न्यायालयाने दोन वेळा त्याला जामीन नाकारला होता. मात्र न्यायालयाने आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले.
हेही वाचा >>>मुंबईः वेबमालिकेच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण; अभिनेता-दिग्दर्शकाला अटक
या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी १३ जुलै २०२२ रोजी याचिका दाखल करण्यात आली. या प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केल्याचे मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. त्याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे दवे आणि ॲड. पाठक यांनी सांगितले.