पिंपरीतील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनी मजदूर संघाच्या अध्यक्षपदी मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली. केंद्रातील सत्तेत बदल झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या खासदाराकडे अध्यक्षपद असावे, असा युक्तिवाद करत बारणेंच्या नावावर संघटनेने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एके काळी ज्येष्ठ खासदार शरद पवार यांच्याकडे बरीच वर्षे असलेले व त्यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे असलेले हे अध्यक्षपद प्रथमच शिवसेनेच्या खासदाराकडे आले आहे.
केंद्र सरकारच्या मालकीची असल्याने एचए कंपनीचे बहुतांश प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळेच स्थानिक खासदारास कामगार संघटनेचे अध्यक्षपद देण्याची परंपरा आहे. त्यानुसार, पवारांकडे अनेक वर्ष हे पद होते. नंतरच्या काळात ते दिल्लीत व्यस्त झाले व त्यांनी स्वत:चा मतदारसंघही बदलला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर निवडून आले. तेव्हा स्थानिक खासदार असूनही त्यांच्या नावाचा विचार न करता संघटनेने पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवड केली होती. पुढे, सुळे यांनी कंपनीतील विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यांना अपेक्षित यश आले नाही. दरम्यानच्या काळात मजदूर संघाच्या निवडणुकीत खांदेपालट झाला व नवे पॅनेल आरुढ झाले. तरीही सुळे अध्यक्षपदी कायम होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपचे सरकार आले.
पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळातून शिवसेनेचे बारणे निवडून आले. केंद्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्याने सुळे यांच्या ऐवजी बारणे यांच्याकडे संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
या संदर्भात, संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सत्ताधारी आघाडीचा खासदार अध्यक्षपदी असणे कामगारांच्या हिताचे आहे, म्हणून मजदूर संघ कार्यकारिणीच्या बैठकीत बारणेंची निवड करण्याचा ठराव मांडला, त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. दरम्यान, कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढू व कामगारांना लवकरच ‘अच्छे दिन’ अनुभवास देऊ, अस विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader