पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आंदोलन केले. आंदोलकांनी खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात एका विद्यार्थी संघटनेने बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ फलक लावल्याने आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपट प्रदर्शनास विरोध करून आंदोलन केल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काश्मिरमधील हिंसाचारावर ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटाचे दिल्लीस्थित दिग्दर्शक प्रभाश चंद्रा यांनी केले आहे. रविवारी (११ फेब्रुवारी) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. त्यानंतर दिग्दर्शक चंद्रा यांच्याशी संवाद साधण्यात येणार होता. काश्मिरमधील हिंसाचारावर आधारित असलेल्या या चित्रपटात भारतीय लष्करावर टीका करण्यात आल्याचा आरोप करून समस्त हिंदू बांधव संघटनेचे ३० ते ३५ कार्यकर्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात आले. त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध करून घोषणाबाजी केली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असल्याचे संयोजकांनी सांगितले. चित्रपटाचे प्रदर्शन पार पडले, त्यानंतर दिग्दर्शक चंद्रा यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. याप्रकरणाची चौकशी सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…करोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्स म्हणतेय, जनुकीय क्रमनिर्धारण सरसकट नको!

‘एफटीआयआय’च्या आवारात ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. आवारातील फलक फाडून सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी समस्त हिंदू बांधव संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांकडून रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरुन ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली होती. ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड प्रकरणी भारतीय जनता पक्षा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तोडफोड केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindutva organization protest at pune ftii s national cinema museum against i am not the river jhelum screening pune print news rbk 25 psg